बुलडाणा : जिल्ह्यात २४ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर इलाज करण्यात येत असून मध्यंतरी पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कोविड हॉस्पिटलचे ऑडिट सध्या जिल्ह्यात करण्यात येत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रारी आल्या नसल्या तरी टप्प्याटप्प्याने या रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली. मुळात अवाजवी देयक व तत्सम बाबीसंदर्भात आरोग्य विभागाकडे नगण्य स्वरूपात तक्रारी आल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार खासगी रुग्णालयांकडून देण्यात येत असलेल्या सुविधा तथा उपचारासंदर्भात ऑडिट सुरू केले आहे. यासाठी तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी अशा तिघांचे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. तालुकानिहाय यासंदर्भात तपासणी करण्यात येत असून प्रकरणी कोठे काही गैरप्रकार आढळून आल्यास संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरर महिन्यादरम्यान पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत हा विषय छेडला होता. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासंदर्भाने सध्या तपासणी सुरू असून गठित करण्यात आलेल्या समितीचे अहवाल आल्यानंतर त्यासंदर्भाने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस म्हणाले.