लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदच्या अनुकंपाधारक ६९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी जि. प. च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, आक्षेप पडताळणीअंती उर्वरित अनुकंपाधारक उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी ५ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनुकंपाधारक एकूण २८६ उमेदवारांची ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता सूची व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या ६९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी ३ जून रोजी जि. प. च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर आक्षेप मागविण्यात आले असता १५ उमेदवारांनी तात्पुरत्या निवड यादीवर आक्षेप सादर केले होते. आक्षेप पडताळणीअंती उर्वरित ६९ अनुकंपाधारक उमेदवार यांचे शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची ३ आॅगस्ट रोजी तपासणी करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता ५ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे. जि.प. च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध अनुकंपाधारक उमेदवारांचे ज्येष्ठता यादीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विस्तर अधिकारी (सांख्यिकी), आरोग्य सेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक पुरूष, औषध निमार्ता, कनिष्ठ लेखाधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि), अंगणवाडी पर्यवेक्षिक व शिक्षण सेवक पदांसाठी शैक्षणिक पात्रता व ज्येष्ठता असुनही निवड झाली नाही. या सर्व अनुकंपाधारक उमेदवारांनी जि. प बुलडाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी ५ आॅगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 3:49 PM