तालुक्यामधील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून, त्याचा फटका अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण हे नगण्य होते. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु नदीकाठची पिके संपूर्ण खरडून गेली आहेत. नदीकाठची अनेक घरेसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. काही घरांची पडझडसुद्धा झालेली आहे. गुरे-ढोरे सुद्धा या पाण्यामध्ये वाहून गेली. तालुक्यामध्ये नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. आ. संजय गायकवाड यांनी तहसीलदार मोताळा यांच्यासोबत तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. तालुक्यातील रोहिनखेड, रिधोरा खंडोपंत, वाडी, वडगाव खंडोपंत, अंत्री, रिधोरा जहांगीर, चिंचपूर या शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काही ठिकाणी चार ते पाच किलोमीटर आत पायी चालत तर कुठं स्वतः दुचाकी चालवत जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
किराणा साहित्याची मदत
पावसामुळे ज्या कुटुंबांवर उपासमारी वेळ आली, अशा गरजू कुटुंबांना आ. संजय गायकवाड यांनी घरपोच किराणा साहित्याचे वाटप केले. शासनदरबारी याचा नुकसानग्रस्त भागाचा पाठपुरावा करून शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू, असेसुद्धा गायकवाड यांनी सांगितले.