शेलगाव देशमुख व लोणी गवळी शिवारामध्ये १८ ऑगस्ट रोजी दुपारी दमदार पाऊस झाला. शेलगाव देशमुख येथून वाहणाऱ्या शेलार नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे शेलगाव देशमुख परिसरातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच शेलगाव देशमुख ग्रामपंचायत परिसरातील अनेक नागरिकांची घरे पाण्याने वेढली गेली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार डॉ. संजय रायमुलकर, तहसीलदार संजय गरकल, जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर, तालुका कृषी अधिकारी काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चित्रांगण खंडारे, वसंतराव देशमुख यांनी या नुकसानाची पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे तलाठी अशोक शेजूळ, तलाठी बालाजी तिरके, ग्रामविकास अधिकारी काळे, लिपिक महादेव कड्डक, ग्राम रोजगार सेवक विष्णू आखरे पाटील, कोतवाल भगवान बघे, किशोर पातूरकर यांनी केले.
पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश
या पावसाच्या पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार संजय रायमुलकर व तहसीलदार संजय गरकल यांनी तलाठी यांना दिले. यावेळी तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, दिलीप बापू देशमुख, ॲड. सुरेश वानखेडे, माजी सभापती गणेश शेवाळे, कैलास खंडारे, इरफान शाह, उपसरपंच विलास कड्डक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व शेतकरी उपस्थित होते.