देशात लोकशाही ऐवजी 'मॉबोक्रॉसी' - फौजिया खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:33 PM2018-07-06T13:33:34+5:302018-07-06T13:36:32+5:30
संविधानाला धोका निर्माण झाला असून त्यासाठी संविधान बचाव रॅली १७ जुलै रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी गुरूवारी बुलडाणा येथे दिली.
बुलडाणा : सत्ताधार्यांच्या कार्यपद्धतीने देशातील लोकशाहीला तथा संविधानाला धोका निर्माण झाला असून एक प्रकारची मॉबोक्रॉसी सुरू आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला असून त्यासाठी संविधान बचाव रॅली १७ जुलै रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी गुरूवारी बुलडाणा येथे दिली. संविधान बचाव मोहिम राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जानेवारीपासून सुरू केली असून मुंबई, दिल्ली येथे यासंदर्भात कार्यक्रम झाले असून आता प्रादेशिकस्तरावर त्यानुषंगाने आंदोलने करण्यात येत आहे. विदर्भातील हे आंदोलन नागपूर येथे होत आहे. त्या संदर्भात नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात १७ जुलै रोजी दुपारी एक वाजता कार्यक्रम होत असल्याचे त्या म्हणाल्या. या पत्रकार परिषदेस पुण्याच्या माजी महापौर विजया भोसले, अमरावतीच्या सुरेखाताई ठाकरे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मगलाताई रायपुरे, अनिता शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, उपाध्यक्ष नरेश शेळके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगितराव भोंगळ पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. संविधान बचाव रॅलीतंर्गत नागपूर येथे मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनची होळी करण्यात येणार आहे. सध्या राज्यात व देशात अराजकात पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधार्यांकडून विरोधकांना कोठेच स्थान दिल्या जात नाही. संविधान धोक्यात आहे. त्याला वाचविण्याची गरज आहे. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. एक प्रकारे हा दुसरा स्वातंत्र्य लढा असून राष्ट्रवादी काँग्रेसने याचे नेतृत्व हे महिलांकडे दिले असल्याचे फौजिया खान म्हणाल्या. दरम्यान, नागपूर येथील या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व राज्यातील सर्व पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही फौजिया खान यांनी अधोरेखीत केले.