लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण केल्या जात असल्याचा ठपका नागपूर खंडपीठाने ठेवल्यानंतर थेट नागपूर खंडपीठाच्या सभागृहातच लोणार सरोवर संवर्धन व विकास आराखड्याच्या अनुषंगाने पुढील महिन्यात बैठक होत असतानाच लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या प्रश्नी भोपाळ येथील स्कूल आॅफ मॅनेटमेंटशी पत्रव्यव्हार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्यास भोपाळच्या स्कूल आॅफ मॅनेजमेंटने सहमती दर्शवली असल्याचे सुत्रांनी सांगितले. पुरातत्व विभागाने हा पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आता लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा प्रत्यक्षात कधी पूर्णत्वास जातो हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. लोणार सरोवर संवर्धन व विकासाच्या दृष्टीने गठीत करण्यात आलेल्या लोणार सरोवर क्षती प्रतिबंधक तथा संवर्धन समिती केवळ अनुषंगीक विषयान्वये बैठकांचा सोपस्कार पारपाडत असल्याचा ठपका ठेवत नागपूर खंडपीठाने या प्रश्नी शासनास मध्यंतरीच्या एका सुनावणी दरम्यान चांगलेच धारेवर धरले होते.त्या पार्श्वभूमीवर आता प्रशाकीय यंत्रणांची धावपळ होत असून पुढील काळात होऊ घातलेल्या बैठकीत सर्वंकष माहिती सादर करण्यासंदर्भात यंत्रणा गंभीरतेने पावले उचलत असल्याचे चित्र आहे. २८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी घेतलेल्या बैठकीत उपरोक्त संदर्भीय विषयान्वये चर्चा करण्यात आली. सोबतच लोणार परीक्षेत्रातील कामाच्या नियोजनाबाबत वर्षनिहाय सविस्तर आराखडा सादर करणे, निधी मागणी, निधीचा स्त्रोत, कामाचे उदिष्ट, फलनिष्पत्ती, अंमलबजावणी यंत्रणा, तांत्रिक यंत्रणा वजागा अधिग्रहणाची अवश्यकता असल्यास त्याची सर्वंकष माहितीच जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी यांनी मागितली आहे. आता प्रशासकीय यंत्रणा त्यादृष्टीने किती तत्परता दाखवते हा कळीचा मुद्दा आहे. प्रामुख्याने हे काम खासगी संस्था किंवा शासकीय संस्थेकडून करण्याबाबत बैठकीत विचार करण्यात येऊन भोपाळ येथील शासकीय संस्थेकडे आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्याचा निर्णय झाला होता.
अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतलोणार सरोवरात नबीच्या नाल्यातून जाणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी अन्यत्र वळविण्याचा मुद्दाही तितकाच गंभीरतेने घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निरी संस्थेसमवेत दर महिन्याला संयुक्तपणे पाहणी करून त्याचा अहवाल लोणार सरोवर क्षती प्रतिबंधक तथा संवर्धन समितीसमोर ठेवावावा, असे स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. विहीत कालावधीत हा अहवाल सादर न झाल्यास संबंधित अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही दिल्या गेले आहेत. सोबतच लोणार पालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वीत ठेवण्याची ताकीदही जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली आहे.
क्वॉलिटी कंट्रोलचा रिपोर्टही मागितलामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हस्तांतरण करताना सादर केलेल्या क्वॉलिटी कंट्रोल रिपोर्टची प्रतच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहे.