मोताळा : जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. राज्य सरकारने बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकर्यांच्या उत्थानासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकर्यांसोबतच राज्य शासन त्याच्या जनावरांचीही काळजी करीत आहे. त्यासाठी शासनाने व्यक्तींप्रमाणेच पशूंनाही आता विम्याचे संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. या योजनेमुळे पशू पालकांना त्यांच्या पशूंची काळजी राहणार नसल्याचा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज व्यक्त केला. राष्ट्रीय पशुधन विमा योजनेच्या राज्यस्तरीय लोकार्पण सोहळ्याचे आज मोताळा येथे आयोजन करण्यात आले होते. पशुधन विमा योजनेचा शुभारंभ करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष अलका खंडारे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, जि.प. कृषी सभापती सुलोचना पाटील, पशुसंवर्धन आयुक्त शिवाजीराव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे डीजीएम विजयराज भैतुले, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त ए. आर हजारे, पशुधन विकास मंडळाचे गायकवाड, जि.प. सदस्य विलास पाटील, नगराध्यक्ष माधुरी देशमुख, राजू माळी, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय जायभाये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पसरटे, योगेंद्र गोडे आदींची उपस्थिती होती. हवालदिल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी अन्न सुरक्षा योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शासनाने आणली आहे. मात्र, जनतेच्या सहभागाशिवाय, लोकप्रतिनिधी व अधिकार्यांच्या सहकार्याशिवाय ह्या योजना यशस्वी होत नाही. गेल्या १0 वर्षांत जगात ३५ टक्के पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. हा समतोल साधण्यामध्ये पशूंची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. पीक विम्याप्रमाणेच सरकार आता शेतकर्यांच्या जनावरांनाही विम्याचे संरक्षण देणार असल्याचे सांगत, पालकमंत्री खडसे म्हणाले, जीवनयात्रा संपविण्याकडे निघालेल्या शेतकर्यांना या परिस्थितीतून बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील शेतकर्यांच्या पशूंचा ५0 टक्के अनुदानावर व मागासवर्गीय शेतकर्यांच्या पशूंचा ७५ टक्के अनुदानावर विमा काढला जाणार आहे. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ आमदार आकाश फुंडकर, न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीचे भैतुले यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक शिवाजीराव भोसले यांनी केले.
पशूंनाही विमा संरक्षण!
By admin | Published: February 13, 2016 2:19 AM