- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेदरम्यान जवळपास १७२ आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी रॅन्डम पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे अनेक शिक्षक स्व जिल्ह्यात अडचणीत आले आहेत. त्यांच्याबाबत पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग व दुर्धर आजाराचा विचार न केल्यामुळे त्यांना आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे गेल्या अडीच महिन्यांपासून त्रांगडे सुरू असून पाचव्या फेरीनंतर आंतरजिल्हा बदलीतील १७२ शिक्षकांसाठी रॅन्डम पध्दतीने निवड पध्दत राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान आंतरजिल्हा बदलीतील काही मोजक्या शिक्षकांना शहराजवळ नियुक्त्या दिल्यामुळे कथितस्तरावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकांना जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यासह दुर्गम क्षेत्रातील शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यातील अनेक शिक्षक पत्नी नोकरी करीत असलेल्या ठिकाणाहून तसेच बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी राहून दररोज ३० ते ४० किलो मिटर अंतरावरील इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर नोकरीसाठी जात होते. यातील अनेक शिक्षक दिव्यांग तसेच दुर्धर आजार असल्यामुळे त्यांना बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या इतर जिल्ह्यातील जि.प.शाळेवर नियुक्ती देण्यात आली होती. मात्र यावर्षी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान स्व जिल्ह्यात येण्यासाठी जालना, जळगाव खान्देश येथील शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी १७२ शिक्षक पात्र ठरले. त्यापैकी बदलीप्रक्रियेच्या पाचव्या फेरीत १२५ शिक्षकांना रॅन्डम पध्दतीने नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे जवळपास १०० शिक्षकांना दुर्गम क्षेत्रातील शाळेवर नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांची ‘आसमान से गिरे, खजूर पे लटके’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बदल्यातील अनियमिततेचा फटका
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षक इतर जिल्ह्यातून स्व जिल्ह्यात आल्यामुळे त्यांना विशेष संवर्ग १ व २ च्या शिक्षकांप्रमाणे पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग, दुर्धर आजाराबाबतचे नियम न लावता रॅन्डम पध्दतीने सरळ नियुक्ती देण्यात आली आहे. कोणतेही नियम न पाळता बदली प्रक्रियेदम्यान मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा फटकाही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांना बसला आहे.