सदानंद सिरसाट,खामगाव : चोरीची दुचाकी विकणाऱ््या आरोपीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत कसून चौकशी केली असता इतर तीन आरोपींचा छडा लागला. त्यांचा शोध घेतल्यानंतर सर्व चार आरोपींकडून एकुण ४२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये बुलढाण्यासह जळगाव, नाशिक आणि मध्य प्रदेशातील दुचाकींचा समावेश आहे. याप्रकरणी चारही आराेपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जळगाव जामोद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरींचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाला गोपनिय खबऱ््यांकडून मोताळा परिसरात विना कागदपत्रांची दुचाकी विक्री करण्यासाठी एक जण फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी संशयित आरोपी नामे शत्रुघ्न रामचंद्र सोळंके (२८) रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद, ह.मु. रिधोरा ता. मोताळा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची कागदपत्रे पाहिली असता ती जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील चोरी केलेली असल्याचे पुढे आले. त्या घटनेचा गुन्हा जळगाव पोलिसात दाखल आहे. आरोपीची साेळंकेची चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या रँकेटमध्ये गंगाराम इकराम पावरा (२०), तुळशीराम इकराम पावरा (२४) दोघेही रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव, सिताराम लेदा मुझाल्दे (२४) , रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन यांचा सहभाग असल्याचे पुढे आले.
पोलिस तपासात त्या चारही आराेपींकडून ४२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा-६, जळगाव खांदेश-९, नाशिक-४ तसेच मध्यप्रदेशातील १६ दुचाकींचा समावेश आहे. ७ दुचाकींच्या कागदपत्रांवरील नोंदीची तपासणी सुरू आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली. आराेपी सोळंके व दोघे पावरा यांना जळगाव जामोद येथील न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी मुझाल्दे याला २० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. पुढील तपास जळगाव जामोद येथील पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि सागर भास्कर व पोलीस अंमलदार उमेश शेगोकार करीत आहेत.- गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पोलिस प्रशासनाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक पोलिस निरिक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थापन केले. पथकाने दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरू केली. तसेच अभिलेखावरील आरोपी तपासून गोपनिय बातमीदार कार्यान्वित केले. ही कारवाई प्रभारी अधिकारी अशोक एन. लांडे यांच्या नेतृत्वात सपोनि नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे, दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, विलास भोसले, सुरेश भिसे, राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली - दुचाकींची दोन राज्यात विक्री
निर्जनस्थळी पार्क केलेल्या दुचाकींना चोरटे लक्ष करायचे. ती चोरण्याचे काम फत्ते केल्यानंतर त्या दुचाकींची कमी पैशात लगतच्या राज्यात तसेच त्या राज्यातून चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्रात विक्री करण्याची पद्धत आरोपींनी सुरू केली होती - दुचाकी खरेदी, गहाण ठेवू नका : पोलिस प्रशासन
नगारिकांनी आपली दुचाकी सीसीटिव्हीच्या निगराणीमध्ये पार्क करावी, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या व्हील लॉकचा वापर करावा. कोणताही व्यक्ती विनाकागदपत्राची गाडी विक्री करीत असल्यास ती खरेदी करू नये, गहाण ठेवू नये. तसेच संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीबददल किंवा त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.