दुसरबीड : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा दळण-वळणाच्या दृष्टीने जलद व सोयीस्कर झाला आहे. विकसितरीत्या हा राज्य महामार्ग काही दिवसांत परिपूर्ण होऊन सुरू होणार आहे. सोबतच महामार्गाला जोडणारा इंटरचेंज रस्ता होणार आहे. हा रस्ता दुसरबीड गावालगत व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत एक निवेदन कार्यकारी संचालक रस्ते विकास महामंडळ यांना परीसरातील शेतकऱ्यांनी दिले आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा सिंदखेड राजा तालुक्यामधून गेलेला आहे. मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा रस्ता दुसरबीड या ठिकाणावरून जातो. नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ ला इंटरचेंज रस्ता होण्यासंदर्भात सर्व्हेही झाला होता आणि यासाठी ११६ हेक्टर जमीन संपादित होणार होती. २०१७ मध्ये संपादित जमिनीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात खुणाही लावण्यात आल्या. मात्र, शासन निर्णय व शेतकऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे काही लोकांनी जमिनी देण्यास नकार दिला होता व संबंधित विभागाकडून या रस्त्याला स्थगिती मिळाली. दुसरबीड या गावी जिजामाता सहकारी साखर कारखाना असून, जिजामाता जन्म स्थळ २० किमी, तर जगप्रसिद्ध लोणार सरोवर अवघे २४ किमी आहे. तसेच नांदेड येथील गुरुद्वाराला जाण्यासही अंतर कमी होते. हा रस्ता इंटरचेंज या ठिकाणी झाला तर परिसरातील विकासकामे तर होतीलच, यासोबत रोजगार निर्मितीही होईल व अनेक गरजूंना रोजगार मिळेल. या रस्त्यासोबतच या ठिकाणी कृषी हब व्हावे अशी विनंतीही शेतकऱ्यांनी केली आहे. या इंटरचेंज संदर्भात २ मार्च रोजी समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाॅ पठाण, सभापती पती विलासराव देशमुख, गंगाधर जाधव, दिनकरराव देशमुख, अभय चव्हाण, माजी उपसभापती इरफानअली शेख, सरपंच पती प्रकाश सांगळे, गुलशेरखा पठाण, मलकापूरपांग्राचे सरपंच भगवान उगले, तेजराव देशमुख, आलम कोटकर, संतोष शिंगणे, गजानन देशमुख, शिवाजी गुंजाळ, प्रा. सुधीर निकम, प्रवीण देशमुख, अनंत देशमुख, सुरेश खंदारे, महेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते.