लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. तुम्ही घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. नेत्रदानाने अंधकारमय जीवनात प्रकाशाचे रंग आपण भरू शकतो. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाईल, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले, तरी त्याच्यामुळे लोकांना अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा अंधारलेल्या आयुष्यात नेत्रदानाने प्रकाश आणता येतो. त्यासाठी नेत्रदानाचे महत्व लक्षात घेवून जग न पाहिलेल्या व्यक्तींना नेत्र दान करून त्यांना हे सुंदर जग पाहण्याची संधी देणे काळाची गरज आहे.भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार, नेत्र दान हे मरणोत्तर करावे, असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. हे नेत्रदान मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करु शकतात. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात.एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी नाही दिली तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केल्या जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहारलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते.नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर सहा ते आठ तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला २४ तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल, तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आजच्या घडीला नेत्रदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक नेत्रदानदिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात १० मार्चपासून जागृतीची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच नेत्रदानासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.-डॉ. पी. बी. पंडीत,जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.