लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे. भारत सरकारने सुध्दा डिजीटल इंडियाचा नारा देत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय आॅनलाईन केले. डिजीटल इंडियाचा गाजावाजा करणाºया शासनाचे पितळ यामुळे उघडे पडत आहे.संग्रामपूर येथे बीएसएनएल चे कार्यालय आहे. तालुक्यात दुसरे कार्यालय सोनाळा येथे आहे. मात्र हे दोन्ही कार्यालय कायम बंद अवस्थेत असून केवळ शोभेची वस्तु बनले आहेत. त्यामुळे बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होते. एकेकाळी बीएसएनएल लँडलाईन तसेच सिमकार्ड वापरणाºयांची सख्या मोठी होती. मात्र सध्या या कंपनीला नागरीकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. भारत सरकारची टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बीएसएनएल आहे, मात्र नाव मोठे दर्शन खोटे याप्रमाणे या कंपनीची गत झाली आहे. ब्रॉण्डबॅण्ड सेवेत महिन्यातून पंधरा दिवस बिघाड येतो. त्यामुळे तालुक्यात लिंकअभावी शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांचे कामकाज पुर्णपणे ठप्प होते. सध्या कोणत्याही क्षेत्रात साधा अर्ज करावयाचा झाला, तरी आॅनलाईन पध्दतीने करावा लागतो. असे असताना, अनेकवेळा इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने पाच मिनीटांच्या कामाला दिवस-दिवस वाट पाहावी लागते. ही मोठी शोकांतिका आहे. बीएसएनएल सोबत खाजगी कंपन्यांची सेवाही फारशी चांगली नाही. फोरजी सेवेच्या नावाखाली टु जी ची इंटरनेट स्पीड मोबाईल धारकांना मिळत आहे. नेटवर्कच्या बाबतीत ही खासगी कंपन्याची सेवा सुध्दा ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. तासनतास नेटवर्क गायब राहते. कॉलड्रॉप बद्दल ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग डिजीटल इंडिया पासून सध्यातरी दूर आहे.
संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 5:04 PM