- अनिल गवई
खामगाव: ‘सर्वे भवन्तु सुखीन; सर्वे संतु निरामया’ हीच भावना आणि अपेक्षा आमच्या ऋषीमुनींची होती. ऋषी...मुनी आणि राष्ट्र उत्थानासाठी झटणाºया महापुरूषांच्या स्वप्नंपूर्तीसाठीच विवेकानंद केंद्राची स्थापना झाली. विवेकानंद केंद्र प्राथमिक स्वरूपात आध्यात्मिक संस्था वाटत असली तरी, आधुनिक भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक जडण-घडणात विवेकानंद केंद्राचे योगदान अलौकीक असल्याचे, कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती सुमित्रा दीदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नव्यानेच स्थापन झालेल्या एका आध्यात्मिक स्थळाला भेट देण्यासाठी त्या खामगाव येथे आल्या असता, त्यांच्याशी साधलेला ‘संवाद’!
विवेकानंद केंद्राची स्थापना कधी झाली?
स्वामी विवेकानंदांच्या जगत कल्याणाच्या विचारांनी प्रेरीत होवून ७ जानेवारी १९७२ साली विवेकानंद केंद्राची कन्याकुमारी येथे स्थापना झाली. एकनाथ रानडे हे विवेकानंद केंद्राचे संस्थापक असून, सद्यस्थितीत पी. परमेश्वरम हे या केंद्राचे विद्यमान अध्यक्षम्हणून कार्यरत आहेत.
विवेकानंद केंद्राच्या कार्याच्या व्याप्तीबद्दल काय सांगाल?
शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त लागत नाही. चांगल्या कार्यासाठी मर्यादाही लागू पडत नाही. त्याप्रमाणेच विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे कार्य अमर्याद आहे. म्हणजेच जिथे मंगल...जिथे चांगल...जिथे सृजन तिथे आम्ही! या विचाराने संपूर्ण देशात विवेकानंद केंद्राचे कार्य सुरू आहे. त्यामुळे निश्चितच विवेकानंद केंद्राची व्याप्ती ठरविता येणार नाही, असे आपले प्रामाणिक मत आहे.
विवेकानंद केंद्राच्या कार्याचे क्षेत्र कोणते?
विवेकानंद केंद्राच्या सेवा कार्यालया जशा मर्यादा लागू नाहीत, तसेच कोणत्याही एका क्षेत्राची निवड करून स्वामी विवेकानंद केंद्राची स्थापना झालेली नाही. बलशाली भारताच्या निर्मितीसाठी स्वामी विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती झटत आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि दुर्बल घटकातील नागरिकांची सेवा यावरच स्वामी विवेकानंद केंद्राने लक्ष्य केंद्रीत केले आहे.
महाराष्ट्र राज्यात विवेकानंद केंद्राचे कार्य दिसत नाही?
विवेकानंद केंद्र ही प्रसिध्दीपासून दूर असलेली संस्था आहे. कोणत्याही संस्थेचे कार्य दिसून येत नाही. म्हणून, त्या संस्थेचे कार्य सुरू अथवा बंद असे ठरविता येत नाही. देशातील आसाम आणि दुर्गम भागातील राज्यांमध्ये या केंद्राचे सेवा कार्य सुरू आहे. महाराष्ट्रातील नागपूर, नंदूरबार, नाशिकच नव्हे तर, बुलडाणा आणि अहमद नगर जिल्ह्यातही विवेकानंद केंद्राचे कार्य अविरत सुरू आहे.
खामगाव येथे येण्याचे प्रयोजन काय?
विवेकानंद केंद्रामध्ये सेवाव्रती असलेल्या अनेकांनी देश कल्याणार्थ आपले जीवन झोकून दिले आहे. खामगाव रत्न तथा जागृती आश्रम आणि तपोवनाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांची जडणघडण विवेकानंद केंद्राचीच देणं आहे. खामगाव येथील जागृती आश्रम विवेकानंद केंद्राचेच प्रतिबिंब आहे. शंकरजी महाराजांशी असलेला स्रेह आणि ऋणानुबंधाचा धागा पकडून विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती खामगाव येथे नियमित येत असतात. दिवाळी निमित्त आपली खामगाव येथील भेट ‘भाऊबीज’ समजायला काहीच हरकत नाही, असे त्या शेवटी म्हणाल्या.
बुलडाणा जिल्ह्यात ‘सेवा’ कार्यास गती देण्याचे प्रयत्न आहेत का?
स्वामी विवेकानंद केंद्राचे सेवाकार्य बुलडाणा जिल्ह्यात कधीचचं सुरू झालयं आणि अपेक्षेप्रमाणं सुरू आहे. त्यामुळे या कार्याला गती देण्याचा प्रश्नच उरत नाही. प.पू.शंकरजी महाराज आणि विवेकानंद केंद्रावर आस्था असणारे अनेक हात बुलडाणा जिल्ह्यात सेवाकार्यासाठी झटत असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प.पू. शंकरजी महाराजांनी विवेकानंद केंद्राचा विस्तार केला आहे.