खामगाव: शहरातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध नळ जोडणी घेतल्यानंतर या पाण्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी खामगावात उघडकीस आला. याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीप्राप्त झाल्यानंतर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील विविध भागात तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला नगर पालिका प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून शहराच्या विविध भागात पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनवरून नागरिकांना नळ जोडणी देण्यात आल्या आहेत. मात्र, शहराच्या काही भागात पाणी पुरवठा करणाºया पाईपलाईनवरून अवैध नळ जोडणी घेतली आहे. या अवैध नळ जोडणीवरील नळाला टिल्लू पंप लावून पाण्याची विक्री सर्रास विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. याप्रकारामुळे नळ जोडणी असलेल्या अनेकांना पाणी पुरवठ्याच्या दिवशी पाणी मिळत नसल्याची ओरड वाढत होती. याबाबत संबधितांकडून पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारींच्या अनुषंगाने शनिवारी शहरातील चांदमारी भागात पालिका प्रशासनाच्यावतीने तपासणी मोहिम राबविण्यात आली.
मशीनचा सर्रास वापर!
शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनवरून अनेकांनी अवैध नळ जोडणी घेतली आहे. या नळ जोडणीवर मशीनचा सर्रास वापर केल्या जात असल्याची धक्कादायक बाब शनिवारी पालिकेच्या तपासणी मोहिमेत उघडकीस आली.
पालिका प्रशासनाकडून समज!
नळाच्या पाण्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने शनिवारी शहराच्या विविध भागात तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामोहिमेत गैरप्रकार आढळलेल्या नागरिकांना समज देण्यात आला. तसेच नळांना तोटी बसविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सभापतींसह अभियंत्यांकडून पाहणी!
नळाच्या पाण्याच्या विक्रीला आळा बसविण्यासाठी पाणी पुरवठा सभापती ओमप्रकाश शर्मा यांच्यासह पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे, कनिष्ठ अभियंता राकेश जाधव, पर्यवेक्षक सुरजसिंह ठाकूर, संतोष परकाळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील पथकाने शनिवारी विविध भागात नळ जोडणीची पाहणी केली.