उद्धव फंगाळमेहकर, दि. २- तालुक्यासह परिसरात तसेच दुसर्या जिल्ह्यामध्ये मेहकरवरून रेतीची अवैध वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाचा दरमहा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. मेहकर महसूल विभागाच्या मूकसंमतीमुळे हा प्रकार सर्रासपणे सुरू असून, अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चाही गावात आहे. सध्या मेहकरसह डोणगाव, जानेफळ, सुलतानपूर आदी ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. ज्या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असेल, त्या परिसरात सध्यातरी बांधकाम करू नये, अशा सूचना असतानाही बांधकाम मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. अशा बांधकामांना रेती पुरवठय़ाचा धंदा मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. टाटा-४0७, मोठे टिप्पर यामधून रेतीची वाहतूक सुरू आहे. लोणार तथा मंठा हद्दीतून ही रेती आणल्या जात आहे. रेती वाहतुकीची १ ते २ ब्रासची रॉयल्टी काढून त्याआधारे जास्त ब्रासची वाहतूक सुरू आहे. हा सर्व प्रकार मेहकरचे महसूल विभागाचे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून दिवसाढवळ्या सुरू आहे. रेती वाहतूक करणारे नियमांचे उल्लंघन करून रेतीची वाहतूक करीत असल्याने कारवाईच्या भीतीपोटी रस्त्यावरून आपली वाहने बेधुंद अवस्थेत व वेगाने चालवतात. त्यामुळे अनेक वेळा अपघातही झालेले आहेत; मात्र संबंधित विभाग व रेती वाहतूकदार यांच्या संमतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याने कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर एक ते दोन महिन्यातून थातूरमातूर कारवाई करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येत आहे; परंतु सध्या मेहकर, डोणगाव, जानेफळ, सुलतानपूरसह मालेगाव, वाशिम, आदी ठिकाणी मेहकरवरूनच रेतीची अवैध वाहतूक करणे सुरू आहे. रेतीच्या या अवैध वाहतुकीतून दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होत असते; मात्र यापैकी महसूलच्या खात्यात किती रक्कम जमा होते, का केवळ कागदी घोडे नाचवणे सुरू आहे. संबंधित अधिकारी तथा रेती वाहतूकदार यांच्या या प्रकारामुळे शासनाचा दरमहा लाखो रुपये महसूल बुडत आहे. तरी संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन शासनाच्या नियमांचे पालन करून ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.गिट्टी वाहतूक करणारे वाहन पकडलेगिट्टीची वाहतूक करणारे वाहन पकडून तहसीलला जमा करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तहसीलदार संतोष काकडे यांनी सोनाटी बायपासवरून गिट्टीची वाहतूक करणारे वाहन पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे.
रेतीची अवैध वाहतूक जोरात!
By admin | Published: April 03, 2017 3:16 AM