डोणगाव (बुलडाणा) : राज्य महामार्गावरील डोणगावनजीक तीन सॉमिल असून, परिसरात बेलगाव, विश्वी ही जंगले आहेत. पण गत काही दिवसांपासून वनाधिकारी व तलाठी यांच्या दुर्लक्षितपणामुळे अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.डोणगाव परिसरात सध्या बाभूळ, आंबा, निंब, काटशेवरच्या झाडांच्या वृक्षांची अवैध तोड करून खुलेआम ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केल्या जाते. डोणगाव येथे वनविभागाचा तपासणी नाका असताना कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. तर तलाठीही याकडे डोळेझाक करीत असल्याने सध्या रस्त्याच्या बाजूला बाभळी व इतर झाडांची कत्तल केली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्ष तोडणार्यांनाही अभय निर्माण झाले आहे. विश्वी, बेलगाव मार्गेही अवैध वृक्षतोडीची वाहतूक रात्री, अपरात्री जोमात सुरू आहे. तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यावरण संतुलनासाठी अवैध वृक्षतोड थांबवावी, तसेच अवैध वृक्षतोडी जबाबदार कर्मचार्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अवैध वृक्षतोड जोमात
By admin | Published: December 31, 2014 12:22 AM