डोणगांव : स्थानिक रहेमत नगर, नरसिंह नगर, खंडोबा नगर परिसरात ८ महिन्यांपूर्वी रस्त्यावर खडीकरण करण्यासाठी चुरी टाकण्यात आली तर काही ठिकाणी विहिरीवरून आणलेले डबर टाकण्यात आले़. परंतु अद्याप सदर खडीकरण केलेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम अर्धवट करणाऱ्या संबंधित एजन्सीची चौकशी करून दिरंगाई करणाऱ्या एजन्सीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
डोणगांव येथे संबंधित एजन्सीने खडीकरण करण्याचे काम ८ महिन्यांपूर्वी घेतले व थातूरमातूर चुरी व डबर टाकून अर्धवट काम केले. रस्त्याच्या अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आले नाही. सदर रस्त्यावर अद्याप मुरुम टाकण्यात आले नाही. या रस्त्यावरून नागरिकांना चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे अर्धवट खडीकरण करणाऱ्या एजन्सीची चौकशी करून कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच सर्व रस्त्याचे खडीकरण त्वरित करावे अन्यथा होणाऱ्या आंदोलनास शासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.