लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: खामगाव-बुलडाणा-अंजिठा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणे ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांनी याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर केलेल्या तक्रारीमुळे खामगाव-बुलडाणा (अजिंठा राज्य महामार्ग), नांदुरा-जळगाव महामार्गासोबतच खामगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. उल्लेखनिय म्हणजे निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामाप्रकरणी खा. प्रतापराव जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्याची चांगलीच कानउघडणीही केली आहे.बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला खामगाव येथून सुरूवात करण्यात आली. खामगाव-रोहणा आणि पुढे दिवठाणा फाट्यापर्यंत या रस्त्याचे दुतर्फा रूंदीकरण करण्यात येत आहे.
बुलडाणा-अंजिठा महामार्गाचा कार्यभार काढला!बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव- बुलडाणा, नांदुरा-जळगाव या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे आधीच चर्चेत आलेले कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्याकडून बुलडाणा-अजिंठा राज्य महामार्गाचा कार्यभार काढण्यात आला आहे. आता त्यांच्या अख्यारीत असलेल्या आणि जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीने तयार केलेल्या दोन्ही महामार्गाची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
खासदारांनी केली कार्यकारी अभियंत्यांची कानउघडणी!‘लोकमत’च्या वस्तुनिष्ठ वृत्तमालिकेनंतर खा. जाधव यांनी रस्ता कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आणि निकषानुसार होत नसल्याचे निर्दशनास येताच, खा. प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे (सा.बां.)यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव-अजिंठा महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या तिनही रस्त्याची तपासणी व्हावी, अशी आपली मागणी आहे. रस्ता कामाच्या दर्जाबाबत आपण अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.- प्रतापराव जाधव, खासदार, बुलडाणा लोकसभा