बुलढाणा:मलकापूर आगाराच्या धावत्या बसचा पत्रा लागून दोघांचे हात कापले जाणे व एकास गंभीर इजा होण्याच्या प्रकरणात आता एसटी महामंडळातर्फे नागपूर नियंत्रण समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात तडकाफडी संबंधित बस चालक व वाहकास निलंबीत करण्यात आले आहे. दुसरीकडे या विचत्र दुर्घटनेच्या संदर्भाने नागपूर नियंत्रण समितीमार्फत प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल हा मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मलकापूर आगाराच्या बसचा (एमेच-४०-एन-९१२१) टुलबॉक्सचा पत्रा बाहेर निघून शुक्रवारी सकाळी सहा वाजता दुचाकीवरील गणेश शंकर पवार (३६, रा. पिंपरी गवळी) याच्या हाताला जबर मार लागला. सोबतच विकास गजानन पांडे (२२, रा. उऱ्हा) याचा हात उघडला तर आव्हा येथील परमेश्वर आनंदा सुरडकर (४५) याचाही हात उखडल्या गेला होता. यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. प्रकरणाचे गांभिर्य पहाता या संपूर्ण प्रकरणाची चौकसी नागपूर नियंत्रण समितीमार्फत करण्यात येत आहे. घटनास्थळी समिती सदस्यांसह जळगाव खान्देशचे विभाग नियंत्रण, बुलढाण्याचे डिटीअेा, यंत्र अभियंता, डेप्युटी मॅकेनिकल इंजिनियरसह काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली.
सीसीटीव्ही फुटेजही तपासले
अपघातग्रस्त बसचे गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने तपासले आहे. सोबतच घटनेच्या आदल्या दिवशी ही बस आगारात परत आल्यानंतरच्या फुटेजचीही तपासणी करण्यात आली. मात्र दुर्घटने संदर्भाचे काही फुटेज मिळते का? याचीही तपासणी समिती करत आहे.
डीसी, एमईअेाचीही बदली
एसटीच्या विभागीय कार्यालयाला विभाग नियंत्रकांसह (डीसी) एमईअेा अर्थात यंत्र अभियंत्यांची बदली झालेली असतानाच १६ सप्टेंबर रोजी हा विचित्र अपघात घडला. परिणामी विभाग नियंत्रक नसल्याने जळगाव खान्देश येथील विभाग नियंत्रकांना मलकापूरात या प्रकरणाच्या चौकसीठी यावे लागले. त्यामुळे येत्या काळात बुलढाणा विभागीय कार्यालयात अनेक धक्के बसण्याची शक्यता आहे.