ग्रामीण भागात मोफत मार्गदर्शन वर्गाची मागणी
किनगाव राजा : अनेक सुशिक्षित बेरोजगार शासकीय नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी मार्गदर्शनासाठी शहरात क्लासेस लावू शकत नाहीत. कोरोनामुळे अनेक भागांतील क्लासेसही बंद झालेले आहेत. ग्रामीण भागात मोफत मार्गदर्शन वर्ग घेण्याची मागणी प्रमोद देशमुख यांनी केली आहे.
सुंदरखेड येथे पाणीपुरवठ्याला विलंब
बुलडाणा : सुंदरखेड येथे नागरिकांना विलंबाने पाणीपुरवठा होत आहे. मुबलक जलसाठा असताना १५ ते २० दिवसांआड नळ सोडण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना आतापासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
सिमेंट बंधाऱ्यांचे निकृष्ट काम
दुसरबीड : जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वतीने दुसरबीड, बीबी, किनगाव राजा शिवारात झालेल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे. या पावसाळ्याच्या दिवसांत अनेक बंधाऱ्यांतून पाण्याची गळती झाली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
हयातीचे प्रमाणपत्र सादर करा!
देऊळगाव मही : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून येत्या मार्च २०२१ पूर्वी हयातीचे प्रमाणपत्र मागविण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधित विभागाला शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लाभार्थी शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
रासेयो श्रमसंस्कार शिबिराला कोरोनाचा फटका
हिवरा आश्रम : राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर गावोगावी आयोजित करण्यात येते. परंतु, कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने अनेक ठिकाणी रासेयोचे श्रमसंस्कार शिबिर रद्द करण्यात आले आहे. या श्रमसंस्कार शिबिरालाही कोरोनाचा फटका बसला आहे.