मलकापूर : केंद्र शासनाच्या नीट परीक्षेतील गैरप्रकाराचे पडसाद मलकापुरात उमटले. शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी मलकापुरात एसडीओ कार्यालयावर धडक दिली. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच गैरप्रकारावर कडवा रोष व्यक्त करण्यात आला आहे.
नीट परीक्षेतील गैरप्रकाराचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत. परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पालक वर्गातून केला जात आहे. त्याच धरतीवर मलकापुरात शेकडो विद्यार्थ्यांनी एसडीओ कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, यावर्षी लागलेल्या नीट परीक्षा निकालात अनपेक्षित बाबी लक्षात आल्या आहेत. ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. हरयाणात एकाच केंद्रावर ८ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. नीट परीक्षा अत्यंत कठीण मानल्या जाते. त्यात पैकीच्या पैकी गुण सहज शक्य नाही. मात्र, यावेळी तसे घडले असल्याने या नीट परीक्षेतील गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास पूर्वकल्पना देऊन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
निवेदनावर कोमल तायडे पाटील, प्रा. अमोल सुभाष पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम लाहुडकर, मंगेश धोरण, प्रा. किशोर मोरे, शिवाजी देशमुख, प्रतीक्षा मुळे, दिव्या वरके, वैष्णवी बोरले, श्रद्धा झाल्टे, श्रावणी थाटे, निशिगंधा वाघमारे, प्राची निहलानी, कोमल चांडक, श्रेया खर्चे आदींसह असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून नीट परीक्षेसाठी सामान्य घरांतील विद्यार्थी अतोनात मेहनत घेत असतात. ही परीक्षा असंख्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट मोकळी करते. त्यामुळे अशा परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्याची सीबीआय किंवा एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- कोमल तायडे पाटील, मलकापूर