- अनिल गवई
खामगाव : सामाजिक वनीकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील तब्बल ३६ क्षेत्रावरील वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाला असतानाच, हजेरी पत्रकातील अनियमितेमुळे हजारो वृक्ष करपल्याचे दिसून येते. मजूर निश्चितीच्या विलंबामुळे अनेक ठिकाणी झाडं सुकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. वृक्ष लागवडीला प्रोत्साहनासाठी ठिकठिकाणी विविध उपक्रमही राबविण्यात येतात. मात्र, वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाकडून याकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जाते. परिणामी, शासनाच्या महत्वांकाक्षी विविध वृक्ष लागवड योजना मातीमोल ठरत असल्याचे दिसून येते. खामगाववनविभागातंर्गत वृक्ष लागवड योजनेचा सर्वाधिक बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
मजुरा संबधीत कामाचे नियोजन विलंबाने करण्यात येते. काही ठिकाणी चक्क मर्जीतील मजूरांना कामावर लावण्याचा खटाटोप केल्या जातो. विलंबाने नियोजन आणि हजेरी पत्रक तयार केल्या जात असल्याने, मजुरांना आपली जबाबदारी निश्चित करण्यात आली अथवा याबाबतीत खात्री नसते. त्याला जबाबदारी माहिती होईपर्यंत एक-दोन दिवस उलटून जातात. त्यामुळे आठवडा अथवा त्यापेक्षा जास्त दिवस लागवड केलेल्या झाडांना पाणी घातले जात नाही. अशा परिस्थितीत अनेक झाडं करपतात. काही सुकतात. परिणामी वृक्ष लागवडीचा उद्देश सफल होत नाही. मात्र, याकडे वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी विभागीय वनाधिकारी एस.ए.पार्डीकर यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होवू शकले नाही.
लागवड आणि मजूरही कागदोपत्री!
कागदोपत्री वृक्ष लागवडच नव्हे तर, मजूरांच्या हजेरी पत्रकातही अनियमितता करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र खामगावतंर्गत एका क्षेत्रावर चक्क एका धनाड्य व्यक्तीला मजूर म्हणून कामावर दाखविण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याचे वेतनही काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
चौकट...
आकस्मिक तपासणीत मजूर गैरहजर!
विहिगाव-नागापूर रस्त्यावर स्थळ पाहणी दरम्यान, लागवड अधिकाºयांनी केलेल्या पाहणीत सलग तीन वर्षांपर्यंत एकही मजूर कामावर नसल्याची बाब उघड झाली. मात्र, तत्कालीन लागवड अधिकाºयांचा अहवाल दाबण्यात येवून सामाजिक वन मजूराच्या भ्रष्टाचाराला बड्या अधिकाºयांकडून खतपाणी घालण्यात आले.
काम दुसरीकडे; कर्तव्य रोहयोवर!
स्थानिक स्वराज्य संस्था, होमगार्ड तसेच निमशासकीय सेवेसोबतच बुलडाणा जिल्ह्यातील एका धार्मिक संस्थेतील दवाखान्यात कामाला असलेल्या एका व्यक्तीला मजूर म्हणून रोहयोचे काम देण्यात आले. त्याच्या नावे मजुरीही काढण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, हा व्यक्ती दुसरीकडेच कर्तव्यावर होता. काम दुसरीकडे आणि कर्तव्य रोहयोवर अशी अनेक उदाहरणं समोर आली असून, होमगार्ड असलेल्या एका व्यक्तीला रोहयोच्या कामावर दाखवून अपहारकेल्या प्रकरणी खामगाव न्यायालयाने, हिवरखेड येथील तत्कालीन सरपंच, सचिव, सदस्यांसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. सामाजिक वनीकरण विभागात वर्षांत मजूरांच्या हजेरीत कमालिची अनियमिता करण्यात आली. या फाईल आता हळूहळू बाहेर येत असल्याने, सामाजिक वनीकरण विभागातील वनमजूरासह अनेक बडे मासे अडकणार असल्याचे दिसून येते.