तालुक्यातील धाड ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व सरपंचांनी कामे न करताच अफरातफर करुन बिले काढल्याची तक्रार माधवराव सांगळे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी रामप्रसाद मुंढे यांनी चौकशी केली असता, गावात अंतर्गत सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा पाईपलाईन, ठक्करबाप्पा योजनेतून झालेली कामे, निर्मल भारत व स्वच्छ भारत झालेल्या कामाबाबत खर्चित निधी, दलित वस्ती सुधार योजनांवरील सर्व योजनेचे अभिलेखच उपलब्ध नाहीत. १४ व्या वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी, विविध योजनेतून केलेली साहित्य खरेदीची तपासणी केली असता ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून १ लाख ३१ हजार ७३६ रुपये संयुक्तरीत्या अनधिकृतपणे खर्च केल्याने वसूल पात्र ठरत आहे. चौकशी अहवालातून भ्रष्टाचाराच्या झाल्याचे उघड झाले असून, ग्रामसेवकाला ३१ डिसेंबर २०२० रोजीच निलंबित करण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने पारदर्शकपणे चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच-ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
माधवराव सांगळे, तक्रारदार.