किनगाव जट्टू : परिसरात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे उभे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे.
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टूसह परिसरात पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील उभे पीक उडीद, मूग, कपाशी, तूर, सोयाबीन इतर पिके सुकत आहेत. तर लागत असलेली फुलांची संख्या घटत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी ज्या मोजक्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांनी तुषार सिंचनाचा आधार घेत उभ्या पिकाला पाणी देणे सुरू केले आहे.
किनगाव जट्टूसह वसंत नगर, देवा नगर, खापरखेड या परिसरात सुरूवातीला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे आणून पेरणी केली होती. दरम्यान आद्रा नक्षत्रात अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्याचे शेतात पाणी साचल्याने पिके वाहून गेल्याने दुबार पेरणी करावी लागली होती. पुन्हा बियाणे विकत घ्यावी लागली होती. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली होती. तरीसुद्धा पाऊस कमी प्रमामात पडूनही शेतकऱ््यांनी पिके जगविली. कोळपणी, निंदण, खुरपणी इतर आंतर मशागत करून खते सुद्धा पिकाला दिली आहेत. त्यातच वातावरणाच्या बदलामुळे पिकावर किटक आळीचा प्रादुर्भाव झाल्याने महागडी औषधे आणून फवारणी करावी लागली. मूग, उडिदाला शेंगा लागत असून, सोयाबिनला फुले लागले आहेत. त्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली असून, वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत आहेत. परंतु किनगाव जट्टू परिसरात पाऊस पडत नसल्याने पिके सुकत असल्याचे चित्र आहे.