- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वेतन व इतर पुरक देयके वेतन पथक अधिक्षक कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील सहाय्यक शिक्षकांकडून देयके दाखल करण्याचे प्रमाण वाढले होते. काही अपवादात्मक परिस्थितीत त्यांना देयके सादर करायची असल्यास त्याकरीता मुख्याध्यापकांची परवानगी आवश्यक असल्याचे निर्देश वेतन पथक अधिक्षकांनी १७ आॅक्टोबर रोजी दिले आहेत.जिल्ह्यात ३९८ खासगी अनुदानित शाळा आहेत. या सर्व शाळांना दर महिन्याला जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षक कार्यालयात वेतन व विविध देयके सादर करावी लागतात. ही जबाबदारी प्रामुख्याने मुख्याध्यापकांची असली तरी आतापर्यंत काही ठिकाणी सहाय्यक शिक्षक देयके कार्यालयात जमा करीत होते. परंतु आता वेतन, भविष्य निर्वाह निधी व इतर देयके मुख्याध्यापकांनाच सादर करावी लागणार आहेत. काही अपरिहार्य कारणास्तव सहाय्यक शिक्षक हे वेतन देयके सादर करीत असतील तर त्यांना देयके सादर करण्याबाबत मुख्याध्यापकांनी प्राधिकृत केल्याचे पत्र वेतन देयकासोबत जोडणे गरजेचे आहे. सर्व देयकांवर वेतन पथक अधिक्षकांची स्वाक्षरी घेऊन वेतन पथक कार्यालयामध्ये देयक आवक करावे. मुख्याध्यापकांनी वेतन पथक अधिक्षकांची स्वाक्षरी घेतली नाही, तर ती देयके मान्य केल्या जाणार नाहीत.वेतन पथक अधिक्षक कार्यालयामध्ये अभ्यागत नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये नोंदी वेतन पथक सादर करताना नोंद करण्याबात सूचित करण्यात आले आहे. इतर शिक्षक वर्ग विनाकारण या कार्यालयामध्ये येत असल्यास ही बाब मुख्याध्यापकांना किंवा वेळप्रसंगी संबंधित संस्थेचे अध्यक्ष, सचिव व व्यवस्थापन मंडळाला याबाबत माहिती देण्यात येईल. नियमांचे पालन करणे सर्व खासगी अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना बंधनकारक राहणार असल्याचे पत्र वेतन पथक अधिक्षकांनी खासगी अनुदानित शाळांना दिले आहेत.
मुख्याध्यापकांनी स्वत: सर्व प्रकारची देयके वेतन पथक अधिक्षक कार्यालयात सादर करावी. काही अडचण असल्यास सहाय्यक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यास तसे संमतीपत्र द्यावे.-मनवर,वेतन पथक अधिक्षक