लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेसोबतच दिलेल्या त्रिसूत्रीचे नागरिकांना आगामी काळातही पालन करावेच लागणार आहे. कारण लसीकरण मोहिमेचा वेग जिल्ह्यात मंद आहे. याच गतीने लसीकरण होत राहिल्यास २०२२ संपेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण झाले तरी मिळवले अशी स्थिती आहे.दरम्यान, त्याउपरही जिल्हा प्रशासन लसीचे डोस मिळताच लसीकरणास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ही २९ लाख ६४ हजार २२० च्या आसपास आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ती २५ लाखांच्या आसपास होती. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील २१ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३७ हजार ९५५ जणांना लस दिली गेली आहे. ६० वर्षांवरील १ लाख ४४ हजार ६६२ जणांना लस दिली गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार २५३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यातील ८७ हजार १०१ जणांना म्हणजे एकूण पात्र लोकसंख्येच्या ४.१४ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे ३ लाख ३७ हजार ६६४ तर कोव्हॅक्सिनचे ८१ हजार ५३१ डोस मिळालेले आहेत. १ लाख ७८ हजार ६५६ पुरुष, तर १ लाख ५३ हजार ३८२ महिलांनी लस घेतली आहे. दुसरा डोस ४.१४ टक्के नागरिकांनी आतापर्यंत घेतला आहे.
१८ वर्षांवरील ४९ हजार ४२९ जणांनी घेतला डोसn१ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण डोस उपलब्धतेची समस्या पाहता मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर या वयोगटातील लसीकरण लांबणीवर टाकले गेले. डोसची उपलब्धता नसताना केंद्राने याबाबत घोषणा का केली, असा प्रश्नही काहीजण विचारत आहेत. १८ वर्षांखालील मुलांचा अद्याप लसीकरणासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्यातच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने पालकवर्गही चिंतित आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात लसीकरणपात्र नागरिकांपैकी ०.५४ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले. तर मे महिन्यात ५.९१ टक्के नागरिकांचे ३० मे पर्यंत लसीकरण झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
१५ हजार जणांना लस देण्याची क्षमताआरोग्य विभागाची प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्जही आहे. आवश्यक सुविधा, शीतकरण यंत्रांची साखळीही उपलब्ध आहे. मात्र लसींचे डोस उपलब्ध होण्यात अडचणी आहे. लस उपलब्ध झाल्यास एक महिन्यात २ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण गुणात्मक पद्धतीने करण्याची क्षमता आरोग्य विभागाची असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
२६ केंद्र सुरूजिल्ह्यात सध्या २६ केंद्रांवर लसीकरण सुरू असून, यातील दोन केंद्र खासगी आहेत. प्रारंभी जिल्ह्यात १०२ लसीकरण केंद्र होते. त्यानंतर लस पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण पाहता टप्प्याटप्प्याने केंद्र कमी झाले. आता सध्या २६ केंद्र सुरू आहेत. प्रशासनाची लस उपलब्ध झाल्यास पूर्ण लसीकरण करण्याची क्षमता असल्याचे सूत्रांनी सांगितले.