लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : युवकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी जलंब पोलिसांनी जामनेर जि. जळगाव येथील पिता- पुत्रास अटक केली. टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी आरोपीने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हत्या झालेल्या आशिषला एका जणाने दत्तक घेतले होते. त्याला कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळणार होती, अशी माहिती असून, त्यामुळे ही हत्या घडवून आणल्याची चर्चा आहे. यादृष्टीने पोलीस या दिशेनेसुध्दा तपास करीत आहेत. मलकापूर येथील आशिष भागवत राणे हा शुक्रवारी त्याचा मित्र प्रकाश बगाडे याच्यासोबत प्रकाशची काकू लता बगाडे यांना अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी घेऊन गेला होता. तो कारने (क्र.एमएच १५-डीसी ५0१३) मलकापूरकडे परतत असताना पारखेड फाट्याजवळ विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांची कार अडवून प्रकाश बगाडे याला खाली उतरवून दिले व कारसह आशिषचे अपहरण केले होते. आशिषची हत्या करून आरोपींनी त्याची कार पळविली होती. याप्रकरणी जलंब पोलिसांनी तपासचक्रे फिरवून जळगाव जिल्ह्यातील पहूर येथे कारसह दोघांना पकडले. चंद्रशेखर सुनील शिंदे (१९) व सुनील नारायण शिंदे (५0 दोघेही रा. नाचणखेड, ता.जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. या पिता- पुत्राची कसून चौकशी केल्यानंतर चंद्रशेखरने कारच्या लालसे पोटी आशिषची हत्या केल्याचे कबूल केले. चंद्रशेखर याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तो अट्टल गुन्हेगार असल्याची माहि ती आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
टॅक्सी व्यवसायासाठी चोरली कार!गेल्या काही दिवसांपासून टॅक्सी व्यवसाय करण्याची आरोपी चंद्रशेखरची इच्छा होती. यासाठी त्याने नवीन कार चोरण्याचे ठरविले. यातूनच शुक्रवारी त्याने खामगाव-नांदुरा मार्गावर आशिष राणेची कार अडवून प्रकाश बगाडेला खाली उतरवून कार पळविली आणि काही अंतरावर आशिषची निर्घृण हत्या केली. त्याने रस्त्यातच कारची नंबर प्लेट बदलली व कार घेऊन नाचणखेड या त्याच्या गावाला पोहोचला. तेथून वडिलांना घेऊन तो जळगावकडे निघाला असता पहूरजवळ त्याला पोलिसांनी जेरबंद केले.