खामगाव: येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त रविवार २१ ते २८ या कालावधीत ऐतिहासिक ‘अष्टान्किा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात खामगावातून देशाच्या कानाकोपºयात गेलेल्या जैन समाज बांधवांसह प्रतिष्ठांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवात देशभरातून दोन हजारावर भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा विश्वास शुक्रवारी एका पत्रपरिषदेत व्यक्त करण्यात आला.
खामगाव येथील आदिनाथ मंदिराची स्थापना सन १८९२ मध्ये संकलेचा परिवाराच्यातीने करण्यात आली. राजस्थान येथील जयपूर येथून आदेश्वर दादा यांची प्रतिमा आणल्यानंतर या प्रतिमेची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर १९४८ साली खामगाव येथे अष्टान्हिका महोत्सव पार पडला होता. त्यानंतर पहिल्यादांच प.पू. साध्वीजी प्रितीधर्माश्रीजी यांच्या मार्गदर्शनात यावर्षी २१ ते २८ जानेवारी या कालावधीत अष्टान्हिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आचार्य विनयसागर, आचार्य गुणचंद्र सागर सुरीश्वरजी यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शहरातील मुख्यमार्गावरून शोभायात्रा काढण्यात येईल. २७ जानेवारी रोजी मोक्षमाला तर २४ जानेवारी रोजी सूरत निवासी कु. रोशनी दीदी यांचा दिक्षा महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. तत्पूर्वी २३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता रोशनी दिदी यांची शोभायात्रा काढण्यात येईल.
या पत्र परिषदेला आचार्य विनयसागर सुरीश्वरजी म.सा., आचार्य गुणचंद्र सागर सुरीश्वरजी म.सा, रविपद्मसागर सुरीश्वरजी म.सा, जैनेंद्रसागर सुरीश्वरजी म.सा., प्रितीधर्माश्रीजी म.सा., समयगुणाश्री जी म.सा, श्री शतकोत्तर रजत महोत्सव समिती तथा सकल जैन समाजाचे नरेंद्रभाई संकलेचा, अनिलभाई विकमशी, राजेशभाई शहा, मनोज शहा, पश्वीन नागडा, हिरेनभाई लोडाया, संदीप शहा, सोनू शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
२८ जानेवारीला महोत्सवाचा मुख्यदिवस
जैन धर्माचे प्रथम तीर्थकार आदेश्वर दादा यांच्या खामगाव येथील आदिनाथ मंदिराला १२५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २८ जानेवारी रोजी ध्वजा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हाच महोत्सवाचा मुख्य दिवस राहणार असून, या उत्सवात मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.