मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बुलडाणा : येथील जांभरुण रोड परिसरामधील भागात, तसेच बस स्थानक पाठीमागील भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे, तर रात्रीच्या वेळेस दुचाकीने जात असताना मोकाट कुत्रे दुचाकीच्या मागे लागतात. यामुळे दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर मोकाट कुत्र्यांचा वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.
--
डोणगाव परिसरात धुंवाधार पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात
डोणगाव : डोणगाव परिसरात सोमवारी रात्री १च्या सुमारास तर मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे कापणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, शेतकऱ्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे.
चांडोळ-सावळी रस्त्यावर खड्डे
चांडोळ : मागील काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चांडोळ ते सावळी या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. हा रस्ता जणू अपघाताला निमंत्रण देत आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. खस्ता हालत झालेल्या या रस्त्यावर अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. भविष्यातील भीषण अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.