यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे की, सामाजिक, न्याय, समता आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी महापुरुषांनी जिवाचे रान केले. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा घेत असतो. त्याच अनुषंगाने महापुरुषांच्या स्मृती म्हणजे त्यांचे पुतळे होते. शहरातील जयस्तंभ चौकातील जागेवर जिल्हा परिषदेने ठराव पारित करून येथे पुतळे उभारावे व त्यांच्या देखभालीसाठी तथा संरक्षणासाठी बुलडाणा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. असे असताना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रतीकांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने जयस्तंभ चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान हाती घेतलेला पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा माँ जिजाऊंसमवेतचा पुतळा, तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या मशालधारी पुतळ्याची उभारणी करावी असे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन जयस्तंभ चौकात प्रतीके नव्हे तर महामानवांच्या पुतळ्यांची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार संजय गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर दिलीप जाधव, ॲड. सुमित सरदार, राहुल सुरडकर, सुनील मोरे, ॲड. राहुल दाभाडे, दीपक मोरे, संजय जाधव, सुनील मोरे, शैलेश खेडेकर, रामेश्वर गाडेकर, दीपक मन्वर, बाला राऊत, सुनील तिजारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जयस्तंभ चौकातील नियोजित स्थळी प्रतीके नव्हे, महापुरुषांचे पुतळे उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:27 AM