लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील अतिक्रमणाविरोधातील मोहिम सुरूच ठेवण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीदेखील अतिक्रमण काढण्यात येत आहे. सोमवारी ५० ते ६० दुकानांवर जेसीबी चालविण्यात आला असून इतर अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त होईपर्यंत कारवाईचा बडगा उगारणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण हटाओ विभागाने दिली आहे.शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा अगदी रस्त्याच्या कडेपर्यंत दुकाने थाटण्यात आली होती. या अतिक्रमित दुकानांवर कारवाई करण्यास ५ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली आहे. सुरूवातीला ४० दुकाने हटवून इतर अतिक्रणधारकांना नोटीस बजाविण्यात आला होत्या. मात्र मध्यंतरी ही कारवाई थंडावली होती. यानंतर २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी शहरातील अतिक्रमणाविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या होता. त्यानुसार २८ डिसेंबरपासून शहरात पुन्हा अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरूवात करण्यात आला. ही मोहिम आता प्रभावीपणे राबविण्यात येत असून सुटीच्या दिवशीदेखील दुकाने हटविण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, सोमवारी मस्जीद, कोंडवाडा व कोर्टाच्या पाठीमागील परिसर, सरकारी जागेवरील पक्की दुकाने व मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांवर जेसीबी चालविण्यात आला. इतर ठिकाणी टीनशेड उभारून पक्की दुकाने थाटलेल्यांनाही आता तोंडी सूचना देण्यात आला आहे. त्यांनी स्वत:हून आपली दुकाने न काढल्या या दुकानांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. आता संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा पालिकेचा मानस आहे. यादृष्टीने पालिकेच्या अतिक्रमण हटाओ विभागाकडून प्रयत्नही सुरू आहेत. उपलब्ध मनुष्यबळानुसार शक्य तेवढी दुकाने हटविण्याचे काम त्यांच्याकडून २८ डिसेंबरपासून आतापर्यंत सतत सुरू आहे. ही कारवाई अशीच सुरू राहिल्यास शहरातील रस्ते मोकळा श्वास घेतील. यामुळे वाहतुकीला निर्माण होणारा अथडळा दूर होऊन शहरवासीयांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.
मुख्य रस्त्यावरील कपड्यांची दुकाने काढलीसंगम चौक ते स्टेट बँक चौकापर्यंत मुख्य रस्त्याच्या बाजूला जवळपास १५ ते २० दुकाने लावण्यात येत होती. स्वत:च्या मालकीची जागा असल्याच्या आविर्भावात ही अतिक्रमणधारक मंडळी वावरताना दिसत होती. या दुकानांमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची वाहने चक्क रस्त्यावर उभी केल्या जात होती. त्यामुळे अनेक किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या प्रकाराकडे पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने सातत्याने कानाडोळा करण्यात येत होता. मात्र सोमवारी ही सर्व दुकाने पालिकेने हटविल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असल्याचे चित्र आहे.