ऑनलाइन लोकमत
मोताळा: नांदूरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजीक महिंद्रा पीक अप जीव व अॅपेमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९:३० वाजता घडली.मोताळा येथील मोहम्मद बशीर (पिर साहब) हे आपल्या कुटुंबियांसमवेत अॅपे क्रमांक एम. एच. २८ आर ३३८६ ने १८ मे रोजी नांदुऱ्याकडे निघाले होते. दरम्यान वरूड फाट्यानजीक सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदुऱ्याकडून काही व्यापारी महिंद्रा पिक अप क्रमांक एम. एच. २८ एबी १९७६ मधून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान रस्त्यात असलेला खडडा् चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महिंद्रा पिकअप दोन पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या अॅपेवर जाऊन आदळली. या अपघातात अॅपेमधील इदुलनिसाबी महमुददुीन (वय ३५) रा. जबलपूर व महिंद्रा पिकअपमधील महम्मद आरिफ अब्दुल रशीद रा. नांदुरा (मोतीनगर) हे ठार झाले. तर अॅपे व महिंद्रा पिकअप वाहनामधील १२ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मोताळा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपरोक्त दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित जखमींना तत्काळ विविध वाहनांद्वारे बुलडाणा येथील रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमीपैकी एकास बुलडाणा येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान तहसीलदार वैशाली देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार एल. के. चव्हाण व मोताळा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी रूग्णालयात येवून घटनेची माहिती व विचारपुस केली. अपघातात अॅपेचा चुराडा झाला असून, अॅपे व महिंद्रा पिकअपमधील जखमींच्या हात, पाय व तोंडाला गंभीर मार लागला आहे. जखमींमध्ये ६ व १६ वर्षांची मुलगी असून, सहा वर्षाच्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अॅपेमधील मृतक महिला(जबलपूर) ही मोताळा येथे आपल्या भावाकडे पाहुणी म्हणून आली होती. मालवाहूमध्ये मोताळ्याच्या आठवडी बाजारासाठी येत असलेले व्यापारी व त्यांचा कांदा, लसणाचा माल होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी असलमशाह वजीरशाह वय २५ रा. मोताळा यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी महिंद्रा पिकअपच्या चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकां गजानन वाघ करीत आहे.