लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिजाऊ जन्मोत्वानिमित्त दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार हा यावर्षी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना जाहीर झाला आहे. मराठा सेवा संघाच्यावतीने १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
स्वाती महाडीक या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाडा येथे ४१ व्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्याच्या अंत्यविधी वेळी त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्यात जाऊन देश सेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी भारतीय सैन्यात लेप्टनंट म्हणून रूजू होऊन आपला हा निर्धार पूर्ण केला आहे. नुकतीच वर्षभराच्या खडकर प्रशिक्षणानंतर चैन्नईतल्या आॅफीसर ट्रेनिंग अॅकेडमीत त्यांनी लेप्टनंट पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व लष्कर प्रमुख जनरल दलविर सिंग यांनी वयाची अट शिथील केली होती. अशा या देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या कर्तृत्ववान महिला स्वाती महाडिक यांचा आदर करत मराठा सेवा संघाने या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार केला आहे. सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ््यातील प्रमुख कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या त्या रहिवाशी आहेत. पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.