लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाविद्यालयातील शिक्षकांनी अरेरावीच्या भाषेत बोलू नये, महाविद्यालयातर्फे विविध सुविधा मिळाव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी येथील जिजामाता महाविद्यालयातील बी.कॉमच्या विद्यार्थ्यांनी १२ डिसेंबर रोजी प्राचार्यांंच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले.जिजामाता महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांशी अरेरावीच्या भाषेत बोलतात, आरओचे पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांंकडून पैसे आकारले; पण पिण्यासाठी आरओचे शुद्ध पाणी मिळत नाही. व्यायामशाळेचे शुल्क आकारले आहे; पण व्यायामशाळा अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या नावाखाली विद्यार्थ्यांंकडून महाविद्यालयाची साफसफाई करण्यात येते. बँक किंवा दुसर्या कामासाठी बोनाफाइडची आवश्यकता असते, त्याचेही शुल्क विद्यार्थ्यांंकडून आकारले जाते. याबाबतच्या समस्या सोडण्यासाठी जिजामाता महाविद्यालयाच्या बी.कॉमच्या विद्यार्थ्यांंनी ठिय्या आंदोलन केले. याबाबत विद्यार्थ्यांंनी आपल्या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन महाविद्यालय व्यवस्थापनास दिले आहे.
विद्यार्थ्यांंनी आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले आहे. महाविद्यालयात कोट्यवधीची कामे झाली असून, विद्यार्थ्यांंना चांगल्या सुविधा दिल्या जातात; मात्र माझ्या अनुपस्थितीत कोणीतरी विद्यार्थ्यांंना चिथावणी दिली आहे. - डॉ.डी.एम. अंभोरे, प्राचार्य, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा.