मेहकर : काँग्रेस पक्षाला फार मोठा जुना इतिहास आहे. काँग्रेसचे विचार ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचलेले आहेत. ग्रामीण भागात बुथ लेवलवर काम करणाºया कार्यकर्त्यांची नाळ अखिल भारतील काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सरळ जोडण्यासाठी काँग्रेस ने ‘शक्ती प्रोजेक्ट’ सुरू केला असून या शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रत्येक बुथवरील १० सदस्यांचा संपर्क थेट राहुल गांधी यांच्याशी होणार असल्याने या शक्ती प्रोजेक्टचा लाभ घेवून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस कमेटीचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केले आहे. स्थानिक गजानन महाराज मंदिराच्या सत्यजित सभागृह मध्ये २० जुलै रोजी मेहकर विधानसभा मतदारसंघाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शक्ती प्रोजेक्टची माहिती देताना श्याम उमाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षनेते लक्ष्मणराव घुमरे, मेहकरचे नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.अनंतराव वानखेडे, मेहकर तालुकाध्यक्ष देवानंद पवार, लोणार तालुकाध्यक्ष राजेश मापारी, जिल्हा काँग्रेसचे गजानन खरात, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, कलीम खान, गणेश बाचरे, विनायकराव टाले, बाला वानखेडे, सुळकर, यूनुस खान, शेरू भाई कुरेशी, फिरोज काजी, दिलीप बोरे, अख्तर कुरेशी, संदीप ढोरे, संतोषराव पांडव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन वसंतराव देशमुख यांनी केले. तर आभार कलीम खान यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)