पावसाची जोरदार हजेरी
डोणगाव : परिसरातील आंध्रूड, उमरा देशमुख, शहापूर शिवारात ११ जुलै रोजी रात्रीदरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला चांगलाच आधार मिळाला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत
साखरखेर्डा : कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गावातील अनेक विद्युत उपकरणे निकामी झाली आहेत. धड खेड्यात नाही आणि धड शहरातही नाही अशी अवस्था साखरखेर्डावासीयांची झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने छोटे-मोठे उद्योग आपली बासने गुंडाळून सुविधा असलेल्या ठिकाणी बस्तान मांडीत आहेत.
बसस्थानकात सुविधांचा अभाव
मेहकर : येथील बसस्थानकावर सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नियमित स्वच्छतेकडेदेखील एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सर्व प्रवासी व येथील नागरिकांच्या वतीने होत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल
बुलडाणा : येथील बस स्थानकाच्या परिसरात व मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून सध्या पाऊस पडत असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्या खड्ड्यांमधून वाहने ये-जा करताना अनेकांच्या अंगावर चिखलमय पाणी उडत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.