अझहर अली, संग्रामपूर: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन पावसाळ्यात कमीतकमी ३ महिने बंद ठेवण्याचे सुचना आहेत. त्या पृष्ठभूमीवर सर्व व्याघ्र प्रकल्प कोअर क्षेत्रामधील टुरिझम पर्यटकांसाठी १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
पावसामूळे दरडी कोसळण्याची शक्यता दाट असल्याने पर्यावरणीय पर्यटकांची सुरक्षेच्या दृष्टीने जूलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी जंगल सफारीवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात २७ जूनला उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभागाकडून सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय (वन्यजीव) ला पत्र प्राप्त झाले आहे. बफर क्षेत्रातील निसर्ग पर्यटन रस्ते पावसाळ्यात खराब होऊ नये तसेच संरक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही. याची दक्षता घेण्यासंदर्भात पत्रातून सूचना करण्यात आली आहे. १५ हजार ८३९.७५ हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेला अंबाबरवा अभयारण्यात वन्यप्राण्यांसह साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई. खैर, आंबा, अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर, कुसुंब असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर्व वृक्ष या जंगलात बघायला मिळतात. काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. या अभयारण्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून पर्यटक येताहेत. या निर्णयामुळे पर्यावरणीय पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अंबाबरवा अभयारण्यात १५ वाघांचा अधिवासअंबाबरवा अभयारण्यात १ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत १९ बीट मध्ये ७० ग्रीड तयार करून १४० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या कडून ट्रॅप कॅमेरा मधील डेटा वर विश्लेषण करण्यात आले असून अभयारण्यात १५ वाघांचे अधिवास असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये ३ नर, ५ मादी, ७ बछडे असे एकूण १५ वाघ सातपुड्यात डरकाळी फोडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठांकडून अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी बंद ठेवण्याचे आदेश कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने पूढील तीन महिन्यांसाठी अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी बंद राहणार आहे.- सुनील वाकोडे, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), सोनाळा ता. संग्रामपूर