किनगाव जट्टू : गत वर्षापासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. पीक कर्जही मिळत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली हाेती, मात्र तीही मिळाली नसल्याचे चित्र आहे.
गतवर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराचे संकट कायम आहे. गतवर्षी मूग, उडीद पिकाच्या शेंगा तोडणीला आलेल्या असतानाच अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. तसेच सोयाबीन सोंगणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा काढला होता, परंतु नुकसानभरपाई मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे दिसत नसल्याने त्यांना पीक कर्ज मिळत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. या महिन्यात शेतकरी किसान सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले, परंतु काही शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहे.
शेतमाल घरातच पडून
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत आहे. एप्रिल महिन्यापासून शासनाने निर्बंध लावल्याने शेतमाल घरातच पडून आहे. संचारबंदी असल्याने अनेक व्यापारी गावाकडे फिरकलेच नाही. निसर्गाचा लहरीपणा, कोरोना महामारीचे संकट अशा विविध अडचणींमुळे किनगाव जट्टू परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरणी अडचणीत सापडली आहे. यावर्षीचा खरीप हंगामाला अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने पीकविमा तसेच नुकसानभरपाईची रक्कम त्वरित मिळावी तसेच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.