गतवर्षी खरीप हंगामामध्ये सुरुवातीला पेरलेले बियाणे उगवले नाही, दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास हिरावला गेला. यातून कसाबसा तग धरत अनेक लोकांनी आपल्या शेतामध्ये टरबूज, खरबूज भाजीपाल्याची पिके लागवड करून उसनवारी उधारीवर घेऊन मोठा खर्च केला. काेराेनाची दुसरी लाट आल्यामुळे शासनाला संपूर्ण संचारबंदी लागू करावी लागली. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने मशागतीची कामे रखडली आहेत. शेती मशागतीसाठी लागणारा खर्च दुप्पट झाला आहे. बियाण्याच्या किमती तीन पट झाल्या. खतांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे साेयाबीन पावसामुळे खराब झाले हाेते. त्यामुळे, अनेकांकडे साेयाबीनच नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील साेयाबीन उगवलेच नव्हते. त्यामुळे, अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. यावर्षी गेल्या वर्षीचेच बियाणे विकण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने लक्ष द्यावे.
शेख आरीफ शेख सत्तार, शेतकरी