डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याचे चित्र आहेत. गेल्या तीन दिवसात २३० च्या जवळपास काेराेना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील केवळ एकच अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बाजारात वाढती गर्दी काेराेना संसर्ग वाढवू शकते. मेहकर तालुक्यात सर्वात पहिला कोरोना रुग्ण हा डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सापडला होता. त्यानंतर सातत्याने येथे कोरोना रुग्ण सापडणे सुरूच होते. सुरूवातीपासून २५ मार्चपर्यंत ३११ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच जवळपास १५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. डोणगावला मोठी बाजारपेठ असून ही बाजारपेठ अकोला व वाशिम दोन्ही जिल्ह्याला जोडलेली आहे. या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातील लोक खरेदीसाठी येतात. त्याने मेहकर आरोग्य विभागाकडून सुपर स्पेडर म्हणून गणल्या जाणाऱ्या दुकानदारांच्या कोरोना चाचणी घेतल्या जात आहेत. यात तीन दिवसात २३० च्या जवळपास कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. ज्यात फक्त एक रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह मिळून आला. मात्र हे प्रमाण वाढू नये यासाठी प्रशासनाने महसूल विभाग, पोलीस विभाग,ग्रामपंचायत या सर्व विभागाने बाजारपेठेत लक्ष देऊन जिल्हा प्रशासनाने दिलेली नियमावलीचे कठोर पालन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आठवडे बाजारातही माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.