बुलडाणा : जिल्ह्यातील माेठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांच्या परिसरात गत काही दिवसांपासून जाेरदार पाऊस सुरू असल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे़ काेराडी, उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले असून खकडपूर्णा, पेनटाकळी व इतर प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे़
जिल्ह्यातील माेठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात ऑगस्ट संपत आल्यानंतरही दमदार पाऊस झाला नव्हता़ ३० ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन झाले आहे़ त्यामुळे मेहकर तालुक्यातील उतावळी आणि काेराडी प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले असून १० सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे़ खकडपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली असून जलसाठा ६७़ २६ टक्यांवर झाला आहे़ पेनटाकळी प्रकल्पात ३९़ ९९ टक्के तर नळगंगा प्रकल्पात २७़ ६३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़
ज्ञानगंगा प्रकल्पात ७४़ ७९ टक्के, मस प्रकल्पात ५२.१७, मनमध्ये ८९.१२, ताेरणा प्रकल्पात ४५.५९, उतावळी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे आतापर्यंतचे प्रमाण कमी आहे़ त्यामुळे अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे़ पलढग प्रकल्पात आतापर्यंत केवळ १८. ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़
खडकपूर्णा प्रकल्पाचे २५ दलघमी पाणी आरक्षित
जिल्ह्यातील माेठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे २५ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात येते़ या धरणातील पाणी बुलडाणा शहरासह देउळगाव राजा, सिंदखेडराजा, सिल्लाेड, जाफराबाद, भाेकरदन आदींसाठी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठीही पाणी मिळते़ यावर्षी जलसाठा वाढला नसल्याने पाणीपुरवठा याेजना प्रभावित हाेण्याची शक्यता आहे़
पेनटाकळी प्रकल्पात ३९.१७ टक्के जलसाठा
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात १ सप्टेंबरपर्यंत ३९. १७ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे़ मेहकर आणि चिखली तालुक्यांतील पाणीपुरवठा याेजनांसह शेतकऱ्यांना सिंचनासाठी या धरणाचा आधार असताे़ यावर्षी अल्प पाऊस झाल्याने पाणीपुरवठा याेजना विस्कळीत हाेण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे़