लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच आणखीही कायम असल्याचे दिसते. वादाचा वचपा काढण्यासाठी शहरातील शिवाजी नगर आणि सती फैल भागात दोन वाहने पेटविण्यात आली. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली. शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळाडूच्या प्रोत्साहनावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान त्यावेळी दगडफेक व तोडफोडीत झाले. यात चार जण जखमी झाले होते, तर १0-१२ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळपासून या भागात सती फैल विरुद्ध शिवाजी फैल असा वर्चस्वाचा ‘सामना’ रंगत असून, गुरुवारी रात्री ९.३0 वाजता दोन्ही फैल अमोरासमोर झाले. कबड्डीच्या वादाची धुसफूस कायम असल्याने, या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू. के. जाधव यांची बदली झाली, त्यानंतर नवीन ठाणेदार संतोष ताले पदभार स्वीकारण्यापूर्वीच शनिवारी पहाटे कबड्डीच्या वादातून दोन वाहने जाळण्यात आली. यामध्ये एमएच २८ टी - २६९२ या ऑटोसह व एमएच २८ व्ही- ६९0३ या डस्टर कारचा समावेश आहे. जाळण्यात आलेला ऑटो रेखा प्लॉट भागातील सूरज शिनगारे यांचा असून, डस्टर कार ही तानाजी व्यायामशाळेचे सचिव ओंकारआप्पा तोडकर यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकाच समुदायातील दोन गट लहान-सहान गोष्टीवरून कुरापती उकरून काढत असल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, ओंकारआप्पा तोडकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात कलम ४३५, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला, तर शिनगारे यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहर पोलिसांनी शिवाजी नगर भागात चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे.
कबड्डीचा वाद गोकूळ नगरपर्यंत!कबड्डीच्या सामन्याच्या वादातून शहरातील शिवाजी फैल आणि सती फैलातील बलाढय़ शक्तींमध्ये सामना रंगत आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या या वादाची धग आता शहरातील गोकूळ नगरपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. गोकूळ नगरातील ओंकारआप्पा तोडकर यांच्या निवासस्थानासमोर उभी असलेली कार पेटवून देण्यात आली.