अनिल गवई /खामगाव: शहरातील कचरा डेपोसाठी बुलडाणा नगर रचनाकार यांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शहरातील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार असल्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने या कचरा डेपोसाठी परवानगी दिली आहे, हे येथे उल्लेखनीय! खामगाव शहरातील सुमारे २५ टन कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २000 नुसार नगर परिषद अंतर्गत नवीन क्षेपणभूमी विकसित करण्यासाठी शहरालगत असलेल्या शिरजगाव देशमुख शिवारातील नगरपालिकेच्या मालकीच्या २३.१२ एकर जागेची निश्चित केली. त्यानुसार जागेवर नागरी घनकचर्याची हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी नगरपालिकेच्यावतीने आवश्यक त्या परवानग्या घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये नगरपालिका प्रशासनाने कचरा डेपो निश्चितीकरण असलेल्या ग्रामपंचायतीसह जिल्हास्तर समिती, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा बुलडाणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला यांनी परवानगी दिली आहे; मात्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून नगर पालिकेने निश्चित केलेल्या प्रश्नांकित जागा पश्चिमेकडून वाहणारी नदी ५00 मीटर अंतराच्या आतमध्ये येणे तसे, विषयांकित जागेच्या पश्चिम हद्दीने लहान नाला वाहत असल्याचे गाव नकाशावरून दिसून येते. तथापि, सदर जागा पाण्याच्या क्षेत्रापासून ५00 मीटर अंतराच्या आत येत असल्याने ती कचरा डेपोकरिता मंजुरीची शिफारस करता येणार नसल्याचे कारण करून कचरा डेपोसाठी परवानगी नाकारली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डी.ई. नामवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खामगाव शहरातील नवीन कचरा डेपोसाठी नगर रचना विभागाने परवानगी नाकारली असल्याचे स्पष्ट केले. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हास्तर समि तीने परवानगी नाकारली असती तर वेगळी गोष्ट असती; मात्र नगररचना विभागाने परवानगी नाकारल्याचे आपणास आश्चर्य आहे. तथापि, यासंदर्भात गेल्या वर्षभरा पासून आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.
खामगावातील कचरा डेपोला नकार
By admin | Published: April 20, 2015 10:40 PM