- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: कोरोना विषाणू संक्रमणामुळे अचानक लागलेल्या संचारबंदीत खामगाव येथील निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची स्वगृही रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आता निवारागृहात परराज्यातील ७१ जण अडकले आहेत.कोरोना विषाणू संक्रमन रोखण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचे आवाहन केले. त्यानंतर दुसºया दिवशी संपूर्ण देशात ‘लॉकडाउन’सुरू झाले. या कालावधीत रोजगार आणि प्रवासासाठी बाहेर असलेले अनेक जण विविध ठिकाणी अडकले. यापैकी काही घरी जाण्यासाठी विविध प्रवासांच्या साधनांसह गावाकडे पायी प्रवास सुरू केला. अशांना पोलिस आणि प्रशासनाकडून स्थानबद्ध करण्यात आले. खामगावात स्थानबध्द करण्यात आलेल्यांना घाटपुरी रोडवरील शासकीय वसतीगृहातील निवारा गृहात ठेवण्यात आले. दरम्यान, निवारागृहातील महाराष्ट्रातील मजुरांना सोडण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झाले. त्यानंतर निवारागृहात २१ पेक्षा जास्त दिवस झालेल्या ३६ जणांची खामगाव येथील निवारागृहातून स्वगृही रवानगी करण्यात आली. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील २७ तर यवतमाळ जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, परराज्यातील ७१ जणांबाबत अद्यापपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्यांने त्यांना निवारागृहातच ठेवण्यात आले आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर सोडले !खामगाव येथील शासकीय वस्तीगृहातील निवारा गृहात कोरोना संचारबंदी दरम्यान अडकलेल्या १०७ जणांना ठेवण्यात आले. यापैकी महाराष्ट्र राज्यातील ३६ जणांना राज्य शासनाच्या परवानगीने सोडण्यात आले आहे.
निवारागृहात अनेकांचे २१ पेक्षा जास्त दिवस पूर्ण!कोरोना संचारबंदी लागू झाल्यानंतर रस्त्याने पायी जाणाºया तसेच विविध वाहनाने प्रवास करणाºयांना टप्प्याने घाटपुरी येथील निवारागृहात दाखल केले होते. येथे त्यांच्या निवाºयासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. निवारागृहातील प्रत्येकाचे समुपदेशन करण्यात येत होते.
खामगाव येथील निवारा गृहातील ३६ जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून सोडण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते. निवारागृहातून सोडण्यात आलेल्यांमध्ये वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील कामगार तसेच नागरिकांचा समावेश आहे.- डॉ.शीतलकुमार रसाळतहसीलदार, खामगाव.