-अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे चालू आणि थकीत पाणीपट्टीकरापोटी नगरपालिका प्रशासनाकडे तब्बल ५५ कोटींची थकबाकी आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेकडून संपूर्ण रकमेचा भरणा होत नसल्याने, गत अनेक वर्षांपासून खामगाव शहराचा पाणीपुरवठा उसनवारीवर सुरू असल्याचे दिसून येते.खामगाव शहर देखभाल व दुरुस्ती पाणीपुरवठा योजनेद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून खामगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, नगरपालिकेकडून देखभाल व दुरुस्तीचा खर्च नियमितपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अदा करण्यात येत नाही. त्यामुळे सन १९९० पासून खामगाव नगरपालिका प्रशासनाकडे मजीप्राची कोट्यवधी रुपयांची देयके थकीत आहेत. थकीत, चालू वसुलीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थानिक कार्यालयांकडून, तसेच विभागीय कार्यालयाकडूनही वारंवार पाठपुरावा करण्यात येतो. मात्र, पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मेटाकुटीस आले आहे. गत कित्येक वर्षांपासून पालिकेचा पाणीपुरवठा उसनवारीवरच सुरू आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची खामगाव पालिकेकडे आतापर्यंत १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या रकमेवरील ३६ कोटींचे व्याज मिळून पालिकेकडे ५४.३६ कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. रकमेसाठी पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे.-एस.डी.इंगळेउपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, खामगाव