- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भाजपाच्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना शिवसेना व काँग्रेस उमेदवारांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसून येते.काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकूल वासनिक यांनी बुलडाणा व मेहकर मतदारसंघातील उमेदवारी रविवारी संध्याकाळी जाहीर केली. यामध्ये घाटाखालील खामगाव, मलकापूर व जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवारीचा समावेश नव्हता. इच्छूक उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदारांमध्येही ‘कोण असेल काँग्रेस उमेदवार’ याबाबत उत्कंठा लागली आहे.बुलडाण्यातून हर्षवर्धन सपकाळ तर मेहकरमधून अनंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली. पहिल्या यादीत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर होतील, अशी अपेक्षा होती; मात्र दोनच मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्या आहेत. सोशल मीडियावर उमेदवाराची यादी फिरत असतानाच अमुक याच उमेदवाराचे दुसऱ्या यादीत नाव आता असणार आहे, अशाप्रकारचे सुचनात्मक मॅजेसही फिरत होते. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. खामगाव, मलकापूर व जळगाव जामोद मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांपैकी काही अद्यापही दिल्लीत तळ ठोकून आहेत. जळगाव जामोद मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्याविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.सहकार नेते प्रसेनजीत पाटील व माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या डॉ. स्वाती वाकेकर या दोघांपैकी एकाला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. खामगाव मतदारसंघात भाजपाचे अॅड. आकाश फुंडकर यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान, अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी तयारी दर्शवली आहे.मलकापूर मतदारसंघात मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरिश रावळ व नांदुरा नगर विकास आघाडीचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मलकापूर मतदारसंघात ना. चैनसुख संचेती यांच्यासारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध निवडणूक लढविणे काँग्रेस उमेदवारांना आव्हानात्मक ठरणार आहे.शिवसेनेचे उमेदवारही तयारीतयुतीचा तिढा अद्याप कायम असल्याने मुंबईत शिवसेनेच्या बैठकीत जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनीही निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. यामध्ये खामगाव मतदारसंघातून शिवसेना तालुकाप्रमुख अनिल अंमलकार, श्रीराम शेंगार, उमेश शेळके तर जळगाव जामोद मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, संपर्क प्रमुख दत्ता पाटील, संतोष घाटोळ, वासुदेव क्षीरसागर यांनीही निवडणुकीची तयारी दर्शवली आहे, तर मलकापूर मतदारसंघातून तालुकाप्रमुख विजय साठे व शिवसैनिक विजय गव्हाड हे सुद्धा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. उपजिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी यावेळेस निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली आहे. प्रत्येक इच्छूक उमेदवाराने आपआपल्या परिने तयारी सुरु केली आहे.
खामगाव : काँग्रेसच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:16 PM