- योगेश फरपट खामगाव : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये खामगाव मतदारसंघाअंतर्गत तालुक्यातील २६४ मतदान केंद्रावर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिर्क्षण कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे. मात्र हे काम करण्यास शिक्षक, ग्रामसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्पष्ट नकार दिल्याने निवडणूक कामकाज प्रभावित झाले आहे. दरम्यान ४ सप्टेंंबररोजी संध्याकाळी उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी मुकेश चव्हाण यांनी फौजदारी कारवाईचा इशारा दिल्याने एसडीओ विरुद्ध कर्मचारी अशी परिस्थिती खामगाव मतदार संघात निर्माण झाली आहे. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व स्थानिक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी सर्व बिएलओ व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण १ सप्टेंबररोजी खामगाव येथील तहसिल कार्यालयात आयोजीत केले होते. या प्रशिक्षणास जिल्हा परिषद व नगरपरिषदेचे मिळून ७४ शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, ग्रामसेवक ९ असे कर्मचारी गैरहजर राहिले. या सर्वांना उपविभागीय अधिकारी यांनी कारणेदाखवा नोटीस बजावल्या आहेत. जे कर्मचारी मतदार यादीचे काम करण्यास टाळाटाळ व किंवा बहिष्कार टाकत असतील त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये कारवाई निश्चित करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हा गुन्हा सक्षम न्यायालयात शाबित झाल्यानंतर २ वर्ष कारावास, दंड अथवा २ वर्ष कारावास आणि दंड दोन्हीही, अशा शिक्षा होवू शकतात. महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) १९७९ नुसार अथवा संबधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या सेवाशर्ती विषयक नियमानुसार सेवेतून निलंबन, बडतर्फ करणे यासारख्या शिक्षा सुद्धा होवू शकतात. त्यामुळे संबधित कर्मचाºयांनी प्रशासनास वेठीत न धरता निवडणूकीचे काम सुरु करावे असे आदेश मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिले आहेत.
शिक्षक संघटना आक्रमक निवडणूकीचे काम कोणत्याही परिस्थितीत करणार नाही असा इशारा यापुर्वीच शिक्षक सेना व प्राथमिक शिक्षक संघटनेने दिला आहे. या कामामुळे शालेय कामकाजाकडे दुर्लक्ष होवून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही कारवाईला सामोरे जायला तयार आहेत. पण निवडणूक काम करणार नाही अशी भूमिकाच शिक्षक, ग्रामसेवकांनी घेतली आहे.