खामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करणाऱ्या आणि साक्षीदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. कुळकर्णी यांनी हा निकाल गुरुवारी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, खामगाव तालुक्यातील नांद्री येथील राजेंद्र रायभान बोदडे हा त्याच्या पत्नीसह रात्री ८ वाजता त्यांनी बटाईने केलेल्या शेतात निघून गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही परत न आल्यामुळे फिर्यादी ज्योती रंजित बोदडे आणि इतर नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मे २०२० रोजी मृतक हर्षा हिचा मृतदेह नांद्री येथील नदीपात्रात आढळून आला. तिच्या शरीरावर कुऱ्हाडीच्या जखमा आढळून आल्या. फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र बोदडे याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा हिवरखेड पोलिसांनी २५ मे रोजी दाखल केला. तर, किकरकोळ वादातून नितेश जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
तपासादरम्यान आरोपीने मृतक हर्षाचा खून करून जखमी यांच्या घरी जाऊन त्याच्यावर हल्ला केला व त्यासाठी कुऱ्हाडीने मानेवर कानाच्या खाली व खांद्यावर मारहाण करून जखमी केले व त्याच्या खुनाचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाले. त्यामुळे तपास अधिकारी पोउपनि प्रवीण तळी यांनी कलम ३०२, ३२२ व ३०७ भादंविप्रमाणे आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र सिद्ध करताना न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले. सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी राजेंद्र बोदडे हा दोषी आढळून आल्याने भादंवि कलम ३०२ मध्ये आजन्म कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, तर कलम ३०७ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाने व्यक्त केली खंत -या घटनेत तीन मुलांची आई जिवाने गेली. तर, वडील जेलमध्ये गेल्याने अल्पवयीन मुले उघड्यावर आल्याने न्यायालयाने खंत व्यक्त केली.
अल्पवयीन मुलांना मदत -उघड्यावर आलेल्या अल्पवयीन मुलांना पीडित भरपाई योजना २०१४ अंतर्गत मदत देण्यासाठी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना लवकरच मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.