- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यातुलनेत बसेसची संख्या तेवढीच आहे. विशेष म्हणजे खामगाव आगाराला गेल्या पाच वर्षात एकही बस मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.सद्यस्थितीत खामगाव आगारात या आगारातील ६८ बसेस आहेत. त्यापैकी १० बसेस नादुरुस्त आहेत. या बसेस दोन ते तीन महिन्यापासून बुलडाणा येथील वर्कशॉपमध्ये दुुरुस्तीसाठी पाठवल्या आहेत. उपलब्ध बसेस सुद्धा मार्गावर बंद पडत असल्याच्या घटना या आठवड्यात तीनदा घडल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेगाव मार्गावर जवळा नजीक शेगाव- अकोला (क्र. एम.एच.४०-५०४१) या क्रमाकांची बस रात्री ८.३० वाजता बंद पडली. तर दुसऱ्याच दिवशी एम.एच.४०- ९७५१ क्रमाकांची बस बंद पडली. बसेस नादुरुस्त असल्यानंतही प्रवाशी वाहतूकीसाठी वापरल्या जातात. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. शिर्डी, नाशिक, सप्तशृंगी, पुणे, औरंगाबाद या मार्गावर सुद्धा बसेस निघतात. उपलब्ध ५८ बसेसपैकी ४५ बसेस ह्या लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठवल्या जातात. उर्वरीत शटल सेवा (शेगाव - खामगाव, खामगाव ते शेगाव) मार्गावर दैनंदिन ३० फेºया करतात. आधीच बसेसची संख्या कमी त्यात आता शाळा, महाविद्यालय १ जूलैपासून सुरु होताहेत. त्यामुळे ग्रामिण भागात बस कोठून पाठवायच्या असा प्रश्न आगार व्यवस्थापकांना पडला आहे. नादुरुस्त बसेस जर दोन दिवसात मिळाल्या नाहीत तर ग्रमिण भागात सेवा कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.
खामगाव आगाराला नाही मिळाली पाच वर्षात एकही नवीन बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 3:16 PM