- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव: मतदारसंघात भाजपचे उमेदवार अॅड. आकाश फुंडकर हे दुसºयांदा विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा १६ हजार मतांनी पराभव केला आहे. आकाश फुंडकर यांच्या विजयाने मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. खामगाव मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. भाजपातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी काँग्रेसमध्ये गेले. तर काही काँग्रेसमधून भाजपामध्ये आले. यामुळे शहर व ग्रामिण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र ऐन निवडणूकीच्या वेळी राजकीय समिकरणे जुळवण्यात अॅड. आकाश फुंडकर यांना यश आले. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत अॅड. आकाश फुंडकर यांना ७०,७६४ मते तर दिलीपकुमार सानंदा यांना ६४७५८ मते मिळाली होती. या निवडणूकीत ७,०६१ मतांनीच केवळ दिलीपकुमार सानंदा यांचा पराभव करू शकले होते. मात्र २०१९ च्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा आकाश फुंडकर यांनी १५ हजार ९९० मतांनी पराभव केल्याचे दिसून येते. त्यामुळे २०१४ च्या निवडणूकीच्या तुलनेत हा दुपट्टीने लिड समजला जात आहे. अॅड. आकाश फुंडकर यांना ८६,७५४ तर ज्ञानेश्वर पाटील यांना ७०,७६४ मते मिळाली असून १५,९९० मते घेवून अॅड. आकाश फुंडकर हे विजयी झाले आहेत. भाऊसाहेब फुंडकर गेल्यानंतर विधासनभेची निवडणूक लढविणे जिकरीचे ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा आकाश फुंडकर यांनी दुपटीने लिड घेवून विरोधक उमेदवाराला १५ हजार ९९० मतांनी पराभूत करीत चर्चेला पुर्णविराम दिला आहे. निकालानंतर खामगाव शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. यामध्ये सर्व जातीधर्मातील लोक सहभागी झालेले दिसून आले. भाजप सोशल मिडिया सेलचे राज्य कार्यकारीणी सदस्य सागर फुंडकर, नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे यांच्यासह भाजपातील ज्येष्ठ पदाधिकारी विजयी मिरवणूकीत सहभागी झाले होते.
खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:50 PM